- महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आता नागरिकांच्या रडारवर…
- भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांचे मौन?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :-पिंपरी-चिंचवड महापालिकेने १५ टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर वाकड परिसरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. स्वामी विवेकानंदनगर, चौधरी पार्क, पारखे वस्ती, शनी मंदिर परिसर आणि आसपासच्या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक सोसायटीधारकांनी ‘न्यूज पीसीएमसी’च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, ”पाणी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नळांना पाणी येणे बंद झाले. त्यामुळे सोसायट्यांमधील पाणीसाठे संपले असून नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र टँकरचे वाढते दर आणि अपुरा पुरवठा यामुळे आर्थिक भुर्दंड वाढला आहे. अनेक वेळा मागणी करूनही टँकर उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.
नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असता, “वरूनच पुरेसे पाणी मिळत नाही,” असे कारण अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचा आरोप सोसायटीधारकांनी केला आहे. पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने जलसाठ्यांवर ताण निर्माण झाला असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे.
भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांचे मौन?…
दरम्यान, या गंभीर प्रश्नावर सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवक मौन बाळगून असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक आणि प्रशासनाने वेळेत नियोजन केले असते तर ही परिस्थिती टाळता आली असती, असा संतापही व्यक्त केला जात आहे. वाकड परिसरातील वाढत्या तक्रारींमुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आता नागरिकांच्या रडारवर आला असून तातडीने पर्यायी व्यवस्था करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.
वाकड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच १५ टक्के पाणी कपातीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवतेय. पाण्याच्या दोन टाक्या आहेत. परंतु, त्या अपुऱ्या पाण्यामुळे भरता येत नाहीत. वरिष्ठ याबाबत आज बैठक घेऊन तोडगा काढतील.
– जय कानडे, कनिष्ठ अभियंता – पाणीपुरवठा विभाग, ड प्रभाग…














