- इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड | २३ जून २०२६ :- देहूरोडजवळील किन्हई गावातील बोडकेवाडी येथील इंद्रायणी नदी परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर धबधबा व नदीकाठावरील पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नदी-धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत असून, अनेक जण जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात.
सोमवारी सायंकाळी एका २४ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या या तरुणाला पोहता येत नसतानाही तो नदीपात्रात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, इंद्रायणी नदीकाठावरील अनेक ठिकाणी धोकादायक खोल पाण्याचे खड्डे असून त्याबाबत पुरेशी सूचना फलक, सुरक्षा रक्षक किंवा बचाव यंत्रणा उपलब्ध नसते. पावसाळ्यात नदीचा प्रवाह वेगवान होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो.
या घटनेनंतर नदीकाठावरील पर्यटनस्थळांवर सुरक्षा उपाययोजना वाढविणे, धोकादायक भागात प्रवेशबंदी करणे आणि पर्यटकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.















