- रिक्षा भाडे नाकारू नका ,डॉ बाबा कांबळे, यांचे रिक्षा चालकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- “प्रवासी हेच आमचे दैवत असून रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे प्रवास करून कोणत्याही प्रवाशाला भाडे नाकारू नये. शिस्तबद्ध सेवा आणि प्रवाशांचा विश्वास हेच रिक्षा व्यवसायाच्या प्रगतीचे सूत्र आहे,” असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केले.
चिखली गावातील ऐतिहासिक गणपती मंदिर परिसरात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष विजय ढगारे, राज्य प्रवक्ता धनंजय कुदळे आणि शहर कार्याध्यक्ष दीपक ताटे यांचा पगडी, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. कांबळे यांनी रिक्षा व्यवसायाला समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी चालकांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. शहरातील बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी संघटितपणे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच चिखली, जाधववाडी, मोई व तळवडे परिसरातील रिक्षाचालकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
या कार्यक्रमास आशा कांबळे, मेजर प्रदीप बावस्कर, संतोष गुंड, सुरज सोनवणे, शुभम तांदळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















