न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून, या पदासाठी अखेर पदोन्नती समितीने सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्या नावाची शिफारस केली आहे. आयुक्त आणि सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर शहर अभियंता पदावर नियुक्ती होणार असल्याने अंतिम निर्णयाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पदोन्नती समितीच्या बैठकीत उद्यान व क्रीडा स्थापत्य विभागाचे मनोज सेठिया, पाणीपुरवठा विभागाचे अजय सूर्यवंशी, बांधकाम परवानगी विभागाचे सुनील भागवानी आणि सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर हे चार अधिकारी पात्र ठरले होते. सहशहर अभियंता म्हणून सर्वाधिक तीन वर्षे आठ महिन्यांचा अनुभव असल्याने सेठिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे हे देखील या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतिम नियुक्ती कोणाची होते, याबाबत उत्सुकता वाढली आहे. माजी शहर अभियंता मकरंद निकम यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर हे महत्त्वाचे पद रिक्त आहे.
















