- चार वर्षांपासून स्वागत कमानीचे काम रखडलेलेच..
- वारकरी, भाविक आणि नागरिकांचा संयम संपला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- देहू आणि आळंदी या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गावरील तळवडे येथील भव्य स्वागत कमानीचे काम महापालिकेच्या नियोजनातील ढिसाळपणाचे उदाहरण ठरत आहे. जून २०२२ मध्ये सुरू झालेल्या या कामाला तब्बल चार वर्षे पूर्ण होत आली, तरी अद्याप केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. तीन वेळा मुदतवाढ, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई आणि वारंवार सूचना देऊनही कामाची गती वाढलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
३० जून २०२२ रोजी या कामाचा आदेश देण्यात आला होता. ठेकेदाराला २४ महिन्यांत म्हणजे २९ जून २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काम रखडल्याने महापालिकेने तीन वेळा मुदतवाढ दिली. विलंबाबद्दल संबंधित ठेकेदारावर दररोज दोन हजार रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. तरीही प्रत्यक्ष कामात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही.
कमानीचे काम रस्त्याच्या मध्यभागी सुरू असल्याने संपूर्ण मार्ग अरुंद झाला आहे. देहू-आळंदी हा मार्ग एमआयडीसी, आयटी पार्क, शाळा, महाविद्यालये आणि निवासी परिसरांना जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. त्यामुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे आषाढी वारी आणि तुकाराम बीज सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आतापर्यंत चार वेळा कमानीचा लोखंडी ढाचा काढण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे काम पुन्हा-पुन्हा थांबले आणि खर्चासह वेळेचाही अपव्यय झाला. मजुरांची कमतरता आणि ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे काम आणखी रखडल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील लाखो वारकरी आणि भाविकांचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात येणारी कमान चार वर्षे अपूर्ण राहिल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दंडात्मक कारवाई असूनही ठेकेदारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. आषाढी वारीपूर्वी तरी हे काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे ही कमान नेमकी कधी पुर्ण होणार? याकडे नागरिकांसह वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
“ठेकेदाराला सुचना केलेल्या आहेत. काम संथ गतीने सुरू आहे. कारण दगडाच्या कामाला वेळ लागतो. पालखीमुळे काही दिवस काम बंद ठेवण्यात येणार आहे. विलंबामुळे ठेकेदाराला दंड आकारण्यात येत आहे. सप्टेंबरअखेर काम पुर्ण होईल.”
– संजय काशिद, कार्यकारी अभियंता, मनपा (स्थापत्य)…















