न्यूज पीसीएमसी नेटवर्क
राजगुरुनगर (दि. २७ जून २०२६) :- चाकण उत्तर पोलिसांनी केटरिंग व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी अपहरण, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना २० मे ते २५ जून २०२६ या कालावधीत वाकी खुर्द (ता. खेड) येथे घडली.
याप्रकरणी दामोदर अंगद यादव (वय ३६, व्यवसाय-केटरिंग) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी वैजीनाथ उघडे (वय १९), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय २१), रवी संतोष परघरमोल (वय १८) आणि प्रेम गिरीष अंकुश (वय २१) या चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोन करून “तू दोन मुलींची छेड काढली असून त्या माझ्याकडे आल्या आहेत. पोलिसांत तक्रार होऊ नये यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आरोपींनी वारंवार जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून हॉटेलचे १,४५० रुपयांचे बिल जबरदस्तीने भरून घेतले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे जबरदस्तीने रिक्षातून अपहरण करून बेल्ट व हाताने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राची भीती दाखवत दोन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीकडे पैसे नसल्याने त्याला केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे उभे करण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी त्याच्याकडून ४५ हजार रुपये रोख तसेच ऑनलाइन स्कॅनरद्वारे १० हजार ९५० रुपये खंडणी म्हणून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१४-एनसी-१६३६) दुचाकीही जबरदस्तीने नेऊन आणखी खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.
















