न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २७ जून २०२६) :- मारुंजी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे एका कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी इमारत मालक व ठेकेदाराला अटक केली आहे.
याप्रकरणी श्रीमती ताराबाई बाळासो महांगरे (वय ६०) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इमारत मालक व्यंकट रामानौ सांगना (वय ४८) व ठेकेदार संजय रामसुख राजभर (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मारुंजी येथील सेव्हन स्टार सिटी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम सुरू होते. जिन्यातून बांधकाम साहित्य वरच्या मजल्यावर नेण्यासाठी कामगारांची ये-जा सुरू असताना तेथे सुरक्षा जाळी, कठडे तसेच इतर आवश्यक सुरक्षितता साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.
याचदरम्यान कामगार अशोक महांगरे हे बांधकाम साहित्य चौथ्या मजल्यावर नेत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या अशोक महांगरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना जाणीवपूर्वक न करता कामगारांकडून काम करून घेतल्याने हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करीत आहेत.
















