सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ३ जुलै २०२६ :- रावेत परिसरात एका अज्ञात महिलेने अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवरून उडी घेतल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील महिला काम मागण्याच्या बहाण्याने संबंधित इमारतीत आली होती. त्यानंतर तिने इमारतीवरून उडी घेतल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. तसेच तिची ओळख आणि नातेवाईकांचा शोध घेण्याचे कामही रावेत पोलीस करत आहेत.
















