न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ | दि. ३ जुलै २०२६ :- मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावरील यूपीआय व्यवहारांमध्ये गैरव्यवहार करून सुमारे २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संजय रमेश बावीसकर (व्यवसाय – व्यापार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेंद्र रामाश्रय पांडे (रा. बागबेढा, जमशेदपूर, झारखंड), विजय बाबुराव त्रिभुवन (रा. वराळे, ता. मावळ) आणि चैतन्य विठ्ठल चांदेकर (रा. मनोहर नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेल विक्रीची रक्कम यूपीआयद्वारे स्वतःच्या तसेच इतर कामगारांच्या बँक खात्यांमध्ये वळती केली. तसेच स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशेब नोंदवून सुमारे २५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोवारकर पुढील तपास करीत आहेत.















