- महावितरण व महापालिकेविरोधात श्रीराम चौकात रहिवाशांकडून आंदोलन..
- पोलिसांनी नागरिकांना दमदाटी केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ८ जुलै २०२६) :- पहिल्याच जोरदार पावसाने रावेत, किवळे, मामुर्डी, गहुंजे आणि विकासनगर परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले, तर वीजपुरवठा खंडित आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी श्रीराम चौकात एकत्र येत महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. लोकवस्ती झपाट्याने वाढत असतानाही स्वतंत्र वीज उपकेंद्र, सक्षम पावसाळी जलनिस्सारण व्यवस्था, दर्जेदार रस्ते आणि पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
बिल्डरांनी आकर्षक आश्वासने देऊन घरे विकली; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचणे, अंधार, पाणीटंचाई आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. परिसरात स्वतंत्र वीज केंद्र नसल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान रावेत पोलिसांनी नागरिकांना दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला. शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्याऐवजी दबाव टाकण्यात आल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समस्या मांडण्यासाठी जमलेल्या नागरिकांशी गुन्हेगारांसारखी वागणूक दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
दरम्यान, वीज आणि पाणी प्रश्नावर नागरिक रस्त्यावर उतरले असतानाही अनेक लोकप्रतिनिधी आंदोलनापासून दूर राहिल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. निवडणुकीत आश्वासनांचा वर्षाव करणारे नेते संकटाच्या काळात नागरिकांसोबत दिसत नसल्याची टीका करण्यात आली. परिसरासाठी स्वतंत्र वीज केंद्र उभारून मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला.

















