न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ८ जुलै २०२६) :- आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मेहतर वाल्मिकी समाज आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती आणि बावनी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि सफाई कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनात उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीतील सर्वाधिक वंचित घटकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पंजाब आणि हरियाणातील उपवर्गीकरणाच्या अनुभवाचा दाखला देत महाराष्ट्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा असतानाही मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले. आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आमदार श्याम खोडे आणि आमदार अमित गोरखे यांनीही मार्गदर्शन केले. राज्य सरकार उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत वाल्मिकी समाजाला न्याय देईल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

















