- ”दुर्घटनेपूर्वी तीन दिवसांपासून कचरा घसरत होता”…
- कचऱ्याच्या डोंगराने हिरावला संसाराचा आधार; नातेवाईकांचा आक्रोश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या दुर्घटनेत अकाउंटंट म्हणून कार्यरत असलेले भावेश मोहन वाणी (वय ३३) यांचा मृत्यू झाला. रुपीनगर येथे शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी, आई-वडील आणि नातेवाईकांचा हंबरडा उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील असलेल्या भावेश यांना त्यांच्या आई-वडिलांनी पापड विक्रीचा व्यवसाय करून मोठ्या कष्टाने शिकवले. पाच वर्षांपूर्वी त्यांना नोकरी मिळाली आणि दीड वर्षांपूर्वी विवाह झाला. “आता माझ्यासोबत राहून आराम करा,” असे म्हणत त्यांनी आई-वडिलांना पुण्यात आणले होते. मात्र, नियतीने त्यांचाच आधार हिरावून घेतला. दहा वर्षांपूर्वी मुलगी गमावलेल्या वाणी कुटुंबावर हा दुसरा मोठा आघात झाला.
दुसरीकडे, मलब्यात अडकलेल्या अक्षय सावंत, राहुल गायकवाड आणि सनी माने यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. “सरकारची मदत नको, फक्त माझा मुलगा सुखरूप परत द्या,” अशी आर्त विनंती अक्षयच्या वडिलांनी केली. राहुलच्या आईने अधिकाऱ्यांच्या पायावर पडत, “माझ्या मुलाला बाहेर काढा, नाहीतर मलाच या ढिगाऱ्याखाली गाडा,” अशी हाक दिली. तर सनीच्या वडिलांनी तीन दिवसांपासून कुटुंबाच्या तोंडात अन्नाचा घास नसल्याचे सांगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान, जखमी कर्मचारी विजय सपकाळ यांनी केलेल्या खुलाशामुळे या दुर्घटनेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेपूर्वी तीन दिवसांपासून कचरा घसरत होता. पार्किंगमधील वाहने हटवून बॅरिकेड्स लावण्यात आले होते, म्हणजेच धोका प्रशासनाच्या लक्षात आला होता. मात्र, इमारतीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळे धोक्याची कल्पना असतानाही कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात का घालण्यात आला? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत असून, या दुर्घटनेस जबाबदार कोण, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

















