- दीड लाखांचे सोन्याचे मिनी गंठण जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० जुलै २०२६) :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने रंगेहात पकडले. आरोपींकडून सुमारे १.५० लाख रुपये किंमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी मार्गावर साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात आली होती. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्शनासाठी आलेल्या सुनिता नारायणराव राऊत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करताना नयना विष्णू काळे (वय २०, रा. संभाजीनगर) व एका विधीसंघर्षित मुलीला पोलिसांनी तात्काळ पकडले. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली.
















