- मोशी दुर्घटनेत महापालिकेची सौम्य भूमिका?..
- नऊ जणांचा बळी गेल्यानंतरही संबंधितांवर गुन्हा नाही..
- पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा कंपनीला केवळ नोटीस…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी महापालिकेने केवळ नोटीस देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेच्या पर्यावरण विभागासह अँटोनी लारा रिन्युएबल या ठेकेदार कंपनीला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
८ जुलै रोजी मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर बचाव पथकांनी अनेक तास शोध व बचावकार्य राबविले.
दरम्यान, एवढी गंभीर दुर्घटना होऊन नऊ निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरही संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल न करता केवळ नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















