न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाकडमधील कस्पटे वस्ती परिसरातील शाळेबाबत महापालिकेचा शिक्षण विभाग चांगलाच सुस्त असून, वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही प्रशासनास जाग येताना दिसून येत नाही.
शाळेची इमारत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अपुरी पडत आहे. वर्गासंख्येअभावी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गाचे नियोजनही करता येत नाही. या परिसरातील महापालिकेच्या शाळेसाठीचे आरक्षण पूर्णपणे ताब्यात घेण्यासही प्रशासन कमी पडत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी महापालिकेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी पराग मुंडे यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”मौजे वाकड (कस्पटे वस्ती) या भागात माध्यमिक शाळा नसल्याकारणाने येथील मुलांना माध्यामिक शिक्षण घेण्याकरीता थेरगाव येथील शाळेत २ ते ३ किलोमीटर पायपीट करत जावे लागते. त्यामुळे गरजु मुलांच्या शिक्षुणाची गैरसोय होत आहे. वाकड (कस्पटे वस्ती) येथे माध्यमिक शाळांसाठी जागेचे आरक्षण असतानादेखिल येथील मुलांना शिक्षणाकरीता पायपीट करावी लागत आहे. ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
त्यांची ही परिस्थिती जरी आपण या वर्षी बदलू शकत नसलो तरी, पुढील वर्षाकरीता आपण आजपासुनच योग्य त्या हालचाली करण्यास सुरवात केली तर, नक्कीच आपण पुढील वर्षाकरीता या परिसरामध्ये माध्यमिक शाळा सुरू करु शकतो. तरी मे. साहेबांना विनंतीपुर्वक निवेदन की, मौजे वाकड (कस्पटे वस्ती) या भागात माध्यमिक शाळा सुरु करण्याकरीता लवकरात लवकर योग्य ती तजवीज करावी, असे कस्पटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.















