न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने देहू शहरात दोन नवीन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी केंद्र शासनाकडून नदी सुधार योजनेअंतर्गत १०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, प्रकल्पांची अंमलबजावणी पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
देहूत सध्या कार्यरत असलेला एसटीपी प्लांट वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा ठरत आहे. शिवाय, तो अनेकदा बंद राहत असल्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार आणि वाढती वसाहत लक्षात घेता अतिरिक्त क्षमतेचे प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली होती.
याअंतर्गत ८ एमएलडी आणि ४ एमएलडी क्षमतेचे असे दोन स्वतंत्र एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. आठ एमएलडीचा प्रकल्प इंद्रायणी आणि सुधा नदीच्या संगम परिसरातील वसंत बंधाऱ्याजवळ, तर चार एमएलडीचा प्रकल्प परंडवाल चौकाजवळील बायपास रस्त्याशेजारी, इंद्रायणी नदीवरील पुलालगत उभारण्याचे नियोजन आहे.
या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १५ वर्षे त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पीएमआरडीएकडेच राहणार आहे, असे मुख्याधिकारी कोंडे यांनी स्पष्ट केले.

















