- दररोज ३० ते ३२ लाख रुपयांची कमाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपोतील वाढत्या कचऱ्याच्या ढिगांमागे केवळ शहरातून येणारा कचरा कारणीभूत नसून, वाहतुकीदरम्यान माती आणि बांधकामातील राडारोडा मिसळून वजन वाढवले जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कचरा वाहतूक आणि संकलनाचे देयक वजनाच्या आधारावर दिले जात असल्याने या पद्धतीतून आर्थिक लाभ मिळवला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
शहरातून दररोज सुमारे १,२०० ते १,३०० टन घनकचरा निर्माण होतो. हा कचरा गोळा करून डेपोपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका दररोज सुमारे ३० ते ३२ लाख रुपये खर्च करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वजनात कृत्रिम वाढ झाल्यास महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात कचरा अजूनही मोशी डेपोतच जमा होत आहे. त्यामुळे डेपोतील कचऱ्याचे डोंगर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
“शहरातील घनकचरा संकलित करून मोशी येथील प्रक्रिया केंद्रात पोहोचविणाऱ्या एजन्सीला कचऱ्याच्या प्रत्यक्ष वजनानुसार मोबदला दिला जातो. या कामासाठीचा दर वेळोवेळी करारातील अटी आणि प्रशासकीय निर्णयांनुसार बदलत असतो. सध्या प्रति टन कचरा वाहतूक व संकलनासाठी साधारण दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत देयक अदा केले जात आहे.”
– प्रदीप ठेंगल, उपायुक्त (आरोग्य), पिंपरी-चिंचवड महापालिका…

















