- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या संदर्भात आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मदत वितरणाची प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढले.
बचावकार्यात एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस आणि अन्य यंत्रणांनी सहभाग घेतला होता. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

















