- आवश्यक कागदपत्रांसह मतदार यादीत नाव समाविष्ट करा; अन्यथा मतदार यादीतून नाव कमी होऊ शकते..
- माजी महापौर शैलजाताई मोरे व माजी भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेस प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरण परिसरात प्रारंभ झाला आहे. नागरिकांसाठी मतदार यादी तपासणी, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच मतदान ओळखपत्रासंदर्भातील आवश्यक मार्गदर्शन माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विधानसभानिहाय प्रभागातील सर्व मतदान केंद्र (शाळा) या ठिकाणी (दि. १२ ते १८ जुलै) दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व बीएलओ (SIR) ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. जे मतदार ही प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांचे नाव मतदार यादीतून कमी होऊ शकते.
यावेळी माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे म्हणाल्या, “मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सन २००२ च्या मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ‘Search Your Name in Last SIR’ या सुविधेचा वापर करता येणार आहे. नाव उपलब्ध नसल्यास आई, वडील किंवा आजी-आजोबांची संबंधित मतदार यादीतील माहिती सादर करावी. कोणताही संभ्रम न बाळगता नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे.”
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप अविनाश मोरे म्हणाले, “युवा मतदारांसह प्रत्येक नागरिकाने SIR प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे. मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.”

















