न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कुदळवाडी प्राथमिक शाळेमध्ये आज सोमवार (दि. १७) रोजी शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थाना क्रमिक पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प आणि खाऊ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेविका अश्विनी जाधव, स्वी. नगरसेवक दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव यादव, संतोष जाधव, गोरबा शेळके आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, कुदळवाडीतील नवीन इमारतीचे बांधकाम येत्या ६ महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच शाळेतील शिक्षकांच्या मागणीनुसार अत्याधुनिक डिजिटल सोई-सुविधायुक्त पद्धतीने पूर्ण करण्याचाही मानस आहे. शाळेसाठी उर्वरित २० गुंठे जागा विद्यार्थ्यांना खेळासाठी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहनही आनंदराव यादव यांनी केले.
नगरसेविका अश्विनी जाधव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना आई-वडीलांप्रमाणेच शिक्षक हाही आदर्श गुरु असतो. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही वाटचाल केली तर नक्कीच यशस्वी व्हाल.
आनंदराव यादव यांनी विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित उपस्थित राहून, अभ्यास केला तर तुम्हीही जीवनात यशस्वी व्हाल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर व सर्व शिक्षकांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत पोटघन यांनी तर, कार्यक्रमाचे आभार विट्ठल बगाटे यांनी मानले.















