- नगरसेवक निखिल बोऱ्हाडे सभागृहात आक्रमक..
- मोशीत कचरा टाकण्यास विरोध..
- दहा प्रभागांत कचरा डेपो आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | १५ जुलै २०२६ :- मोशीतील कचरा प्रश्नावर भाजपचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनासह राजकीय नेतृत्वाला धारेवर धरले.
महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बोऱ्हाडे यांनी मोशी कचरा डेपोचा प्रश्न सभागृहात उचलून धरला.
“आमच्या मोशीगावाने संपूर्ण महापालिकेचा ठेका घेतला आहे का? आमच्या गावाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत बोऱ्हाडे यांनी संताप व्यक्त केला. खडकी डेपोतील कचरा पिंपरी-चिंचवड हद्दीत का आणला जातो आणि त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोशी परिसरात नळ आणि बोअरवेलमधून दूषित पाणी येत असून नागरिक आजारी पडत असल्याचा दावा बोऱ्हाडे यांनी केला. या परिस्थितीला सर्वच राजकीय नेते जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.
“आता मोशीत कचरा टाकू देणार नाही. एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही,” असा इशारा देत पुनावळे येथील नियोजित जागा ताब्यात घेऊन कचरा डेपो सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील किमान दहा प्रभागांत स्वतंत्र कचरा डेपो आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारून विकास आराखड्यात त्याची तरतूद करावी, अशी मागणी बोऱ्हाडे यांनी केली.
















