न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- विशालनगर ते बाणेर जोडणाऱ्या नव्या पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते रविराज बबन काळे यांनी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर तीव्र टीका केली. ‘स्मार्ट सिटी’चे दावे करणाऱ्या महापालिकेला मुख्य पुलावरील कचऱ्याचेही व्यवस्थापन करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तातडीने कचरा हटवून पुलाची स्वच्छता करावी, तसेच भविष्यात येथे कचरा टाकला जाणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. “अधिकारी तात्काळ जागे झाले नाहीत, तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा कचरा उचलून थेट महापालिकेच्या आवारात आणून टाकतील,” असा थेट इशाराही काळे यांनी दिला.

















