- समन्वय, तत्परता आणि विभागनिहाय नियोजनाचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांचे निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य असून सर्व विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
कुलदीप जंगम यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) सज्ज ठेवावी, सखल भागांची नियमित पाहणी करावी, पूरस्थितीत निवारा केंद्रे तयार ठेवावीत तसेच आरोग्य विभागाने औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, असे सांगितले. पाणी साचणाऱ्या भागांसाठी पंप, धोकादायक ठिकाणी जेसीबी यंत्रणा आणि पुनर्वसनासाठी वाहने सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आपदा मित्र स्वयंसेवकांशी समन्वय ठेवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळेल, यासाठी सर्व यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

















