न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २३ जुलै २०२६) :- नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ‘भारत टॅक्सी’ सेवेचे उद्घाटन झाले. मात्र, महाराष्ट्रातील प्रमुख ऑटो-टॅक्सी चालक संघटनांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम पार पडल्याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भारत टॅक्सी ही संकल्पना स्वागतार्ह असली तरी त्यामध्ये टू-व्हीलर टॅक्सीचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे राज्यातील ३० लाखांहून अधिक ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या रोजगारावर परिणाम होईल, असे ते म्हणाले. ओला, उबर, रॅपिडोसारख्या कंपन्यांच्या शोषणाला पर्याय म्हणून भारत टॅक्सीचे स्वागत आहे; मात्र टू-व्हीलर टॅक्सीला आमचा कायम विरोध राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देत लवकरच राज्यव्यापी कृती समितीची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.

















