- गुन्हेगारांवर राहिला नाही पोलीसांचा वचक..
- आरोपीला कठोर शासन करण्याची शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांची मागणी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. २८ जुलै २०२६) :- ताथवडे येथे ६५ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले, तरी महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिन्यातून दोन-तीन अत्याचाराच्या घटना घडत असतील, तर हेच का कायद्याचे राज्य ? असा सवाल उपस्थित करत गुन्हेगारांवर पोलिसांचा आणि पोलिसांवर गृह खात्याचा अंकुश राहिला नसल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी केली.
पीडित मुलींचे आई-वडील, आजी-आजोबा आणि काका मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबातील सर्वजण कामावर गेल्याची संधी साधून आरोपीने हे दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी मंगळवारी (ता. २८) पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात निवेदन देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
पोलीस उपायुक्त जाधव साहेब, निरीक्षक साळुंखे साहेब, तपास अधिकारी सहायक निरीक्षक कु-हाडे साहेब यांच्याशी चर्चा करुन आरोपीच्या कठोर शिक्षेची मागणी केली. यावेळी जिल्हा संघटिका अनिता तुतारे, उपजिल्हा संघटिका कल्पना शेटे, उपशहर संघटिका योगिनी मोहन, उपशहर संघटिका तस्लिम शेख, विभाग संघटिका गीता कुसाळकर, विभाग संघटिका कमल गोडांबे, उपविभाग संघटिका वंदना खंडागळे, उपविभाग संघटिका श्रद्धा शिंदे उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. महिला आणि बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही.
आज राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या दर महिन्याला दोन ते तीन घटना घडत आहेत. महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर गृह खाते नेमके करते तरी काय ? असा संतप्त सवाल पवार यांनी केला. पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. अशा नराधमाना कायद्याचा धाक उरलेला नाही. महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर हेच का कायद्याचे राज्य ? सरकारने केवळ आश्वासने न देता महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि कठोर पावले उचलावीत.
— चेतन पवार, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

















