- ज्येष्ठ लेखक,कवी,साहित्यिक तसेच अभिनेते व दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा मानपत्र देऊन गौरव…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ जुलै २०२६० :- पिंपरी-चिंचवड शहराच्या साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक रमेश वाकनीस यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी वाकनीस यांच्या कार्याचा गौरव करत शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी अशा व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सातत्याने होत राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते रमेश वाकनीस यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राजू मिसाळ, अमित गावडे तसेच अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शैलजाताई मोरे म्हणाल्या की, “रमेश वाकनीस यांनी आपल्या लेखणीतून आणि रंगकर्मातून समाजाला विचार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या साहित्यकृती आणि नाट्यसृष्टीतील योगदानामुळे पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाली आहे. अशा ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आहे. नव्या पिढीला साहित्य, नाटक आणि संस्कृतीची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करून महापालिकेने योग्य पाऊल उचलले आहे.”
रमेश वाकनीस यांनी कवी, लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी साहित्य व रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. “पूर”, “आकाशा आणि काही कविता” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “ओळखावा धोंडा अंतरीचा” आणि “कहाणी अखेरच्या संपाची” ही नाटके विशेष गाजली आहेत. प्राचीन पाली भाषेतील “धम्मपद” या ग्रंथाचा मराठी काव्यानुवाद करून त्यांनी साहित्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. रंगभूमी, बालनाट्य आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या बहुआयामी योगदानाची दखल घेत महापालिकेने त्यांचा मानपत्र देऊन गौरव केला.


















