- पाणी कपात तातडीने रद्द करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कामगार आघाडी अध्यक्ष शुभम यादव यांचे आयुक्तांना निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरल्याने शहरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा तात्काळ बंद करून नागरिकांना दररोज व मुबलक पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कामगार आघाडी अध्यक्ष शुभम यादव यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यादव यांनी निवेदनात म्हटले आहे की, धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने घरगुती वापरासह दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, पुरेसे पाणी उपलब्ध असताना नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील कोणत्याही भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित पाणीपुरवठा विभागाला तातडीने आवश्यक निर्देश देऊन दररोज, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.


















