- २९ जुलैपासून अंमलबजावणी; अंतिम एसओपी तयार होईपर्यंत तात्पुरती शिथिलता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून, हे आदेश २९ जुलै २०२६ पासून अंतिम एसओपी तयार होईपर्यंत लागू राहणार आहेत.
अधिसूचनेनुसार, शनिवार व रविवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत आरएमसी वाहनांवरील बंदी कायम राहणार असून, उर्वरित वेळेत वाहतुकीस शिथिलता देण्यात आली आहे. तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच आरएमसी वाहनांना प्रवेशाची परवानगी असेल. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेतील निर्बंध कायम राहतील.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक आरएमसी वाहनावर ३६० अंश कॅमेरा बसविणे किंवा क्लिनर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्लांटमध्ये डी.डी. मशीन बसवून वाहन बाहेर पडण्यापूर्वी तपासणी करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
हे बदल एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार असून, हायवा, डंपर, ट्रक आदी इतर जड वाहनांच्या वाहतुकीत कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.


















