- सर्वपक्षीय बैठकीत तक्रार निवारण, कर्मचारी वाढ व नवीन सब-स्टेशनसह महत्त्वाचे निर्णय..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ जुलै २०२६) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वाढत्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरण येथील सावरकर भवनात उच्चस्तरीय सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत आमदार गोरखे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत एका महिन्यात ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
शाहूनगर, संभाजीनगर, काळभोरनगर, निगडी प्राधिकरण, मोहननगर, मोरवाडी, विद्यानगर आणि आकुर्डी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाडानंतर दुरुस्तीस होणारा विलंब आणि सलग अनेक तास वीज नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी बैठकीत मांडल्या.
बैठकीत प्रत्येक बुधवारी ‘तक्रार निवारण दिन’ राबविणे, २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित तक्रारींचे प्राधान्याने निवारण करणे, वाढत्या मागणीनुसार आवश्यक कर्मचारी नियुक्त करणे, नवीन सब-स्टेशन उभारणीला गती देणे आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
“वीज हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा त्रास सहन केला जाणार नाही. महावितरणने एका महिन्याच्या आत आपली यंत्रणा सुधारून सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करावा,” असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला.
बैठकीला उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कैलास कुटे, अनुप मोरे, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच वीज तक्रारींसाठी महावितरणने ७८७५७२४०९१ आणि ७८७५७२४५४९ हे हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.


















