- स्थायी समितीत धोरणाला मान्यता; महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि बालकांसाठी सुलभ सुविधांवर भर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शौचालय धोरण’ लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांनी या धोरणाला मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी हा विषय लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे.
शहरातील वाढते शहरीकरण, लोकसंख्या आणि सार्वजनिक शौचालयांची वाढती गरज लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची उपलब्धता वाढविणे, उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती रोखणे तसेच विद्यमान शौचालयांची देखभाल आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
नवीन धोरणात महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीयपंथी नागरिकांसाठी सुलभ सुविधा, शौचालयांचे डिजिटल मॅपिंग, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशयोजना, सुरक्षा तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक-खासगी सहभाग (PPP) तत्त्वावर व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
“वाढत्या शहराच्या गरजेनुसार नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. हे धोरण शहराच्या स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनात महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असा विश्वास स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला.


















