- दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..
- आमदार रोहित पवार यांची कंत्राटदार, कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
रोहित पवार म्हणाले की, मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना संबंधित ठेकेदाराने प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. कुलकर्णी, संबंधित संस्थेचे संचालक आणि वेस्ट-टू-एनर्जी (WTE) कंपनीच्या जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी आरोप केला की, पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर आमदार महेश लांडगे यांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.
मोशी दुर्घटनेतील बचावकार्यात झालेल्या विलंबावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कुदळवाडीतील कारवाईसाठी शेकडो जेसीबी आणि यंत्रसामग्री उपलब्ध होते. मात्र मोशीतील कचरा हटवण्यासाठी आवश्यक मशिनरी महापालिकेकडे नव्हती. ती पुण्यातून मागवावी लागली आणि ती येण्यासाठी तब्बल ३६ तासांचा विलंब झाला. ही मशिनरी महापालिकेकडे उपलब्ध असती, तर कदाचित काही निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते,” असे ते म्हणाले.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी, मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आणि राहण्यासाठी घर देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
महापालिका प्रशासन ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

















