- महापौर रवि लांडगे यांचे अधिकाऱ्यांना आदेश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- कुदळवाडीतील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा साचण्याच्या समस्येची महापौर रवि लांडगे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
नागरिकांनी परिसरात साचणारा कचरा, प्लास्टिक व टायर जाळल्याने होणारे वायू प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्यासमवेत बैठक घेऊन कचरा व्यवस्थापन, नियमित स्वच्छता, बेकायदेशीर कचरा टाकण्यावर नियंत्रण आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले.
“ही केवळ स्वच्छतेची नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. १५ दिवसांत कृती आराखडा राबवून कायमस्वरूपी तोडगा काढावा. प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांनाही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

















