न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सुसज्ज जीवनमान (Ease oF Living) बाबत (दि. १५) रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत मिटिंग आयोजित केली होती.
महत्वपुर्ण मिटिंग असल्याने सर्व संबंधित अधिका-यांना वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या असतानाही, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील हे अधिकारी नियोजित मिटिंगला वेळेवर आले नाहीत.
गैरहजर राहून त्यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या अधिका-यांची १५ जूनची अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकली आहे. यापुढे कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास नियमाधिन कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.











