- महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक…
- पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन परिमंडळ…
- सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सुरु होणार…
- रावेत आणि गहुंजे उपकेंद्राच्या कामाला गती..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करून शहर लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महावितरण व महापारेषण अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ‘प्रकाश भवन’ येथे झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड, राजगुरुनगर आणि लोणावळ्यासाठी स्वतंत्र वीज परिमंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळून ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण होण्यास मदत होणार आहे.
बैठकीत पुढील सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सुरू करणे, यशदा परिसरात नवीन उपकेंद्र उभारणे, गहुंजे येथील २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रस्तावाला गती देणे तसेच भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन सबस्टेशन आणि डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पूरप्रवण भागातील ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी हलविणे, मतदारसंघनिहाय वीज वितरण सनियंत्रण समित्या स्थापन करणे, रस्ते खोदाईमुळे भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान टाळण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नियमित ग्राहक मेळावे घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार जगताप यांनी कालबद्ध नियोजन आणि समन्वयातून पिंपरी-चिंचवड पूर्णपणे लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले.

















