- ‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग’ (IIAE) च्या शैक्षणिक सत्राच्या अभ्यासक्रमाचा शुभारंभ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ३१ जुलै २०२६) :- एव्हिएशन क्षेत्र हे आजच्या गतिमान युगात अत्यंत वेगाने प्रगती करणारे आणि भविष्यात देशाला आर्थिक व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वोच्च स्थानी नेणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर नव्हे, तर एव्हिएशन सारख्या जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असा मोलाचा सल्ला पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एव्हिएशन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हडपसर, मांजरी येथील ‘इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग’ (IIAE) या नामांकित संस्थेमध्ये २०२६-२७ या नव्या शैक्षणिक सत्राचा आणि अभ्यासक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लावली, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे फाउंडर डायरेक्टर श्री. एफ. एस. गिरी आणि संचालक श्री. नरेंद्र एफ. गिरी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, सभापती अभिषेक बारणे यांनी विमान वाहतूक आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अमर्याद संधींवर प्रकाश टाकला. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगसारख्या उच्च दर्जाच्या संस्थेत प्रवेश मिळणे हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा सुवर्णकाळ आहे. येथे मिळणारे प्रात्यक्षिक ज्ञान आणि शिस्त ही भावी यशाची पायाभरणी ठरेल.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसर हा नेहमीच औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीमध्ये अग्रेसर राहिला आहे. अशा प्रगतशील वातावरणात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. इंदिरा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे जागतिक दर्जाचे शिक्षण देशाच्या एरोस्पेस उद्योगाला नक्कीच नवी दिशा देईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पहिल्याच दिवशी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे थेट मार्गदर्शन लाभल्यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मोठा आत्मविश्वास संचारला. विमान देखभाल अभियांत्रिकी (AME) क्षेत्रातील तांत्रिक आव्हानांना कसे सामोरे जावे, याबाबत मिळालेली माहिती अत्यंत मार्गदर्शक ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगने मागील १६ वर्षांत विमान वाहतूक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मान्य अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना १५ हून अधिक नामांकित MROs आणि एअरलाइन्समध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग व प्लेसमेंटची संधी मिळते. पहिल्याच दिवसाच्या या शानदार शुभारंभाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला असून ते विमान वाहतूक व एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.


















