न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या आठ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा शुक्रवारी शिवनेरी हॉल येथे आयोजित समारंभात सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल धायगुडे, सिताराम केवळ, बबन विरणक, दिनेश ढवळे, लता अंबरी, हेमा भरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केशव शेळके आणि पोलीस शिपाई महादेव सुरवसे यांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, झाडाचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित होते. मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या निरोगी व आनंदी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















