न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महानगरपालिका व खाजगी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती कार्यक्रम आणि कराटे (स्वसंरक्षण) प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महिला व लहान मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींमध्ये लहान वयापासूनच योग्य-अयोग्य स्पर्शाची जाणीव, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची क्षमता विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ समुपदेशक, महिला पोलीस अधिकारी आणि बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या माध्यमातून शाळांमध्ये नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू करून त्यांना संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
या महत्त्वाच्या सामाजिक विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देत हा उपक्रम पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांमध्ये तातडीने राबवावा, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.


















