न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ :- वाकड येथील स्टार बाजारमध्ये महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात सात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविकांत जाकरे, ब्रिजेश मदेशिया, ब्रिजेश यादव, सोनम बाबू शेख, सलमा शेख, सानिया बाबूमिया शेख, रूमा मदेशिया अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी वाकड येथील स्टार बाजारमध्ये तीन ते चार अनोळखी महिला व तीन पुरुष इनोव्हा कारमधून आले. त्यांनी गोवर्धन तूप, बदाम, काजू तसेच इतर खाद्यवस्तू असा सुमारे ४२ हजार १०० रुपये किमतीचा माल चोरी केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून चोरीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार मुंबईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी वाकड, पिंपरी आणि चिखली परिसरातील स्टार बाजार तसेच पुण्यातील केसनंद फाटा व वाघोली येथील स्टार बाजारमधूनही काजू, बदाम व तुपाची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपींविरुद्ध पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

















