न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. हेमदेव थापर यांनी भारताच्या फाळणीच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
१९३० मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या परिषदेत मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र देशाची मागणी करण्यात आली आणि तेथूनच फाळणीची चर्चा सुरू झाली. पुढे मुस्लिम लीगने ‘पाकिस्तान’ची मागणी पुढे नेली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले, असे थापर यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५४२ संस्थाने भारतात विलीन केली. मात्र, काश्मीरला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विशेष दर्जा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करून त्या निर्णयाला पूर्णविराम दिला, असेही त्यांनी नमूद केले.
शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, सिंधी समाजातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. नानिक पंजाबी, सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले.


















