- पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी; उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली. मुख्य इमारतीसह कूलर, झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या, वाहनतळ आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
तपासणीदरम्यान साचलेले पाणी तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे हा प्रतिबंधाचा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी घर, कार्यालय व परिसरात पाणी साचू न देण्याचे तसेच कूलर, कुंड्या आणि पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. अशी तपासणी मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार आहे.


















