- श्री साई मित्र परिवार व निसर्ग ग्रुपच्या वतीने सेक्टर २६ येथे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- “स्वातंत्र्य दिन केवळ देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव नसून, भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना निसर्गाचे स्वातंत्र्यही जपले पाहिजे,” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी दिला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री साई मित्र परिवार आणि निसर्ग ग्रुप यांच्या वतीने सेक्टर २६, प्राधिकरण येथे मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वृक्षांची लागवड केली. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अनुप मोरे म्हणाले, “आज लावलेले एक रोप भविष्यात अनेकांना सावली, प्राणवायू आणि पर्यावरणीय संतुलन देणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान काही झाडे लावून त्यांचे संगोपन करावे. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा सामाजिक संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
श्री साई मित्र परिवार आणि निसर्ग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना आणि पर्यावरणप्रेम यांची सांगड घालत नागरिकांनी हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचा संदेश या उपक्रमातून दिला.


















