- नागरिकांनो आंदोलनासाठी एकत्र या – प्रदीप गायकवाड..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते आकुर्डी-काळभोरनगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. मेट्रो प्रकल्पाचे काम आवश्यक असले तरी त्यासाठी नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कै. अजितदादा पवार) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.
गायकवाड म्हणाले, “मेट्रोची भिक नको, पण विकासाचे कुत्रे आवरा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निगडी ते आकुर्डी मार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि रस्त्याची झालेली चाळण यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.”
पिंपरी ते दापोडी मेट्रो कामाच्या काळातही नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. आता निगडी ते आकुर्डी भागातील काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
आमदार शंकर जगताप यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मेट्रो प्रकल्पाबाबत बैठक घेतली. मात्र, सध्या नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक व रस्त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका गायकवाड यांनी केली.
नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले असून, संपर्कासाठी ८६०५५४८३९६ हा क्रमांक दिला आहे.


















