- पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४१.६४ टक्के नावे वगळण्याच्या यादीत..
- २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) घरभेट मोहीम १७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली असून, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तब्बल १७ लाख २४ हजार ५३७ मतदारांची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत ६ लाख १२ हजार ७२५ मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मयत, दुबार किंवा अन्य कारणांमुळे वगळण्याच्या यादीत आढळली आहेत.
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, शहरातील एकूण मतदारांपैकी सुमारे ३५.५३ टक्के मतदार वगळण्याच्या यादीत आहेत. तर ११ लाख ३१ हजार ७६८ मतदार प्रारूप मतदार यादीत कायम राहणार आहेत.
३० जूनपासून शहरात बीएलओंच्या माध्यमातून एसआयआरची घरभेट मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत मतदारांना गणना अर्ज देणे, भरलेले अर्ज स्वीकारणे तसेच मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. तीनही विधानसभा मतदारसंघांतील ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
पिंपरीत सर्वाधिक नावे वगळण्याची शक्यता…
तीनही मतदारसंघांमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघात वगळण्याच्या यादीतील मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पिंपरीत एकूण ४ लाख १ हजार ९७५ मतदारांपैकी १ लाख ६७ हजार ३९२ मतदार वगळण्याच्या यादीत आहेत. हे प्रमाण ४१.६४ टक्के असून, २ लाख ३४ हजार ५८३ मतदार प्रारूप यादीत राहणार आहेत.
चिंचवडमध्येही मोठी संख्या…
चिंचवड विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८७ हजार ४४८ मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ७२ हजार ९८० मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मयत, दुबार किंवा अन्य कारणांमुळे वगळण्याच्या यादीत आढळली. हे प्रमाण ३९.७१ टक्के आहे.
भोसरीत प्रमाण तुलनेने कमी..
भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ३५ हजार ११४ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार ३५३ मतदार वगळण्याच्या यादीत आहेत. या मतदारसंघातील वगळण्याचे प्रमाण २७.१३ टक्के आहे. तर ४ लाख ८२ हजार ७६२ मतदार प्रारूप मतदार यादीत असतील.
२४ ऑगस्टला स्पष्ट होणार चित्र…
एसआयआरची घरभेट मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या यादीत नाव नसलेल्या नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. दावे-हरकतींची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाव वगळले असल्यास संबंधित नागरिकांनी निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


















