- कंत्राटदाराच्या कामकाजाची चौकशी होणार?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई उतरविण्याचे काम सुरू असतानाच कासारवाडी येथे एका कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राहुल साबळे (वय ४३, रा. विजयनगर, काळेवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते पार्वती इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदार कंपनीकडे कार्यरत होते.
मंगळवारी दुपारी सुमारास पार्वती इलेक्ट्रिकल्सचे चार कामगार कासारवाडी येथील महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावर विद्युत रोषणाई काढण्यासाठी गेले होते. दोन मजली इमारतीवरील पत्र्याच्या छतावर काम सुरू असताना राहुल साबळे यांचा अचानक तोल गेला. पाय घसरल्याने ते छतावरून खाली पडले.
या दुर्घटनेत साबळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची..?
उंचावर विद्युत रोषणाई काढण्याचे काम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. कामगारांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का, तसेच कामासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दुर्घटनेनंतर मृत कामगाराच्या कुटुंबाला नुकसानभरपाई कोण देणार, महापालिका विद्युत विभागाची जबाबदारी कितपत आहे आणि संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी काय, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. कामगाराच्या मृत्यूमागे नेमकी कोणाची हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा तपास झाल्यानंतरच जबाबदारी निश्चित होणार आहे.
“रोषणाई काढण्याचे काम संबंधित कंत्राटदाराने नेमलेल्या कामगारांकडून केले जात होते. घटनास्थळी येऊन काम करण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्यात आली होती का, याची माहिती तपासली जात आहे. या दुर्घटनेची वस्तुस्थिती आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक माहिती घेतली जाईल.”
– गणेश राऊत, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.“क्षेत्रीय कार्यालयावरील स्वातंत्र्य दिनाची सजावट काढण्याचे काम सुरू होते. यावेळी चार कामगार छतावर गेले होते. कामादरम्यान एका कामगाराचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.”
– विशाल ठुबे, उपअभियंता, विद्युत, ‘ह’ प्रभाग.


















