- चिंचवड दुसऱ्या क्रमांकावर..
- नव्याने नोंदणी आणि दावे-हरकतींमुळे मतदारसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) जिल्ह्यातील मतदारसंघांचे चित्र बदलले आहे. यापूर्वी सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड मतदारसंघाला मागे टाकत भोसरी आता जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत याचे अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.
एसआयआरची घरभेट मोहीम १७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. भोसरी मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख ६३ हजार १२९ गणना अर्जांचे डिजिटायझेशन झाल्याने या मतदारसंघाची मतदारसंख्या आता सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे.
चिंचवड दुसऱ्या क्रमांकावर…
एसआयआरपूर्वी चिंचवड मतदारसंघात ६ लाख ८७ हजार ४४८ मतदार होते. पुनरीक्षणानंतर वगळण्यात येणाऱ्या नोंदींचा विचार करता चिंचवडमध्ये सुमारे ४ लाख १७ हजार ३५१ मतदार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंचवड जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ ठरू शकतो.
यानंतर शिरूरमध्ये सुमारे ३ लाख ७२ हजार ७, भोरमध्ये ३ लाख ५९ हजार २८०, तर हडपसरमध्ये ३ लाख ५२ हजार ९२७ मतदार राहण्याचा अंदाज आहे.
अंतिम आकडा बदलू शकतो…
२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांची नावे यादीत नसतील, त्यांना निर्धारित कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर काही मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून रखडलेली नवमतदार नोंदणीही पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रारूप यादीतील मतदारसंख्या अंतिम यादीपर्यंत कायम राहणार नसून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.


















