- ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’चे वितरण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा होणार गौरव…
- शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांची माहिती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’ या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजता ताथवडे येथील सुखवाणी फार्म्स, नरसिंह मंदिराजवळ, बीआरटी रोड येथे हा सोहळा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘उद्धवश्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राज्यसभा खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच, शिवसेना उपनेत्या विशाखाताई राऊत, महाराष्ट्र संघटिका रंजनाताई नेवाळकर, पुणे शहर शिवसेना प्रमुख वसंत (तात्या) मोरे, माजी पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी-चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख विजय सुळे, भोसरी संपर्कप्रमुख सुनील सावंत, पुणे शहर संपर्क संघटिका मेघनाताई काकडे माने आणि पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दहा मान्यवरांना ‘उद्धवश्री’ पुरस्कार जाहीर..
या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संतोष महालसाकांत लाटकर आणि डॉ. रोहन एस. काटे, साहित्य क्षेत्रातील प्रा. तुकाराम दादा पाटील, कामगार क्षेत्रातील काशिनाथ विठ्ठलराव नखाते, सामाजिक क्षेत्रातील प्रीती दीपक वैद्य, क्रीडा क्षेत्रातील चाँदपाशा अहमद हुसेन तांबोळी आणि पै. योगेश्वर देवीदास तापकीर, सामाजिक क्षेत्रातील भाग्यश्री गिरीष मोरे, कृषी क्षेत्रातील रामदास भगवान काटे तसेच कला क्षेत्रातील डॉ. संजीवकुमार पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे.
चेतन महादेव पवार म्हणाले, “उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान व्हावा, या भावनेतून ‘उद्धवश्री पुरस्कार’ सोहळ्याची संकल्पना पुढे आली. पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक, वैद्यकीय, साहित्यिक, क्रीडा, कामगार, कृषी आणि कला क्षेत्रात अनेक व्यक्ती निस्वार्थपणे योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी आणि समाजहिताचे काम अधिक व्यापक व्हावे, हाच या सोहळ्यामागील उद्देश आहे. हा कार्यक्रम राजकीय चौकटीपलीकडे जाऊन कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरेल. त्यामुळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


















