- पाचवी पास ते उच्चशिक्षित उमेदवारांसह दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी; नामांकित कंपन्यांचा सहभाग…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे रविवारी, ३० ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक पवार आदी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात बँकिंग, आयटी, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसह विविध क्षेत्रांतील कंपन्या व उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विश्वजीत बारणे यांनी सांगितले की, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन आणि बीव्हीजी इंडिया यांसारख्या नामांकित आस्थापनांचे प्रतिनिधी मेळाव्यात उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
पाचवी उत्तीर्ण उमेदवारांपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी विविध प्रकारच्या नोकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठीही विशेष रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नोकरी न मिळालेल्यांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’…
मेळाव्याच्या दिवशी थेट नोकरीची संधी न मिळालेल्या उमेदवारांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’ देण्यात येणार आहे. या माध्यमातून उमेदवारांची माहिती संकलित करून भविष्यात त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत त्यांना माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिलांसाठी स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन…
महिलांसाठीही या मेळाव्यात विशेष मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास आणि व्यवसायाच्या संधींबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. नोकरीच्या संधींसोबतच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.


















