न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातील प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सह शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांचा अतिरिक्त पदभार दोन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सदर पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक असल्याने प्रशासनाच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता (स्थापत्य) विनय भाऊसाहेब ओहोळ यांच्याकडे सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
तसेच उपअभियंता (स्थापत्य) पंकज सुधाकर धेंडे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे यापूर्वी सोपविण्यात आलेल्या आस्थापना विभागाच्या तसेच मूळ पदाच्या कामकाजासोबत पर्यावरण विभागातील अतिरिक्त पदभाराचे कामकाजही पुढील आदेशापर्यंत सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पदभाराच्या अनुषंगाने प्रदान करण्यात आलेले अधिकार संबंधित अधिकाऱ्यांनी सक्षमपणे वापरावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोहन निकम यांच्याकडे यापूर्वी आदेशाद्वारे सोपविण्यात आलेला अतिरिक्त पदभार प्रस्तुत आदेशान्वये निरस्त करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागातील कामकाजात सातत्य राहावे, प्रशासकीय निर्णय व विभागीय कामांना गती मिळावी आणि नागरिकांशी संबंधित कामकाज प्रभावीपणे सुरू राहावे, या उद्देशाने ही प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली आहे. प्रस्तुत आदेशाचा अंमल तात्काळ लागू करण्यात आला आहे.


















