- मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची धमकी देत रक्कम भरण्यास भाग पाडले….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तसेच सर्वोच्च न्यायालयाचे बनावट पत्र पाठवून एका ७१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना पिंपळे गुरव येथे समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू महादेव घारे (वय ७१, रा. गजानन नगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपींनी घारे यांच्याशी संपर्क साधला.
आरोपींनी आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवून घारे यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल असल्याची भीती दाखविण्यात आली. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे असल्याचे भासविणारे खोटे व बनावट पत्रही पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या घारे यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांची मालमत्ता आणि बँक खाती जप्त केली जातील, अशी भीती दाखविण्यात आली. त्यानंतर आरोपींनी घारे यांना कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात चेकद्वारे एकूण १५ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३३६, ३३७, ३४०, ३४२(१), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीत मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा वापर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, इतर अनोळखी व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय आहे. सपोनि बोराडे व वपोनि कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


















