- बीआरटीएस मार्गांच्या दुरुस्तीपासून जपानी-जर्मन भाषा अभ्यासक्रमापर्यंत विविध विकासकामांना हिरवा कंदील…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांना सभेत मंजुरी देण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला शहर अभियंता पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीया यांचा स्थायी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध विकासकामांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
जलशुद्धीकरण व पाणी वितरणाला प्राधान्य..
निगडी सेक्टर २३ आणि चिखली टप्पा क्रमांक १ येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी पावडर पॉली इलेक्ट्रोलाईट (Cationic) आणि स्टेबल ब्लिचिंग पावडर (TCL) खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. अजमेरा, मोरवाडी आणि मासुळकर कॉलनी परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेच्या परिचालनासही मान्यता देण्यात आली.
दापोडी, जुनी सांगवी आणि नवी सांगवी येथील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई तसेच कृष्णानगर येथील एम-१ व एस-२ पंप हाऊस आणि पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील देखभाल, दुरुस्ती व परिचालनाची कामेही केली जाणार आहेत.
युवकांसाठी जपानी-जर्मन भाषा प्रशिक्षण..
महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागांतर्गत मोरवाडी आणि कासारवाडी येथे जपानी व जर्मन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात भाषा प्रशिक्षणासोबत आंतरराष्ट्रीय भाषा परीक्षांचे मार्गदर्शन, पुस्तके व अभ्यास साहित्य, अधिकृत प्रमाणपत्र आणि भारतासह परदेशातील रोजगारासाठी प्लेसमेंट सपोर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्वयंरोजगार, स्टार्टअप, शासकीय योजना आणि सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
रस्ते आणि बीआरटीएस दुरुस्तीला मंजुरी…
नाशिक फाटा-वाकड बीआरटीएस मार्गावरील दुरुस्ती, पुणे-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉरवरील डेडिकेटेड लेन व बसथांब्यांची दुरुस्ती तसेच भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक आणि पुणे-आळंदी रस्त्यावरील पॅचवर्क डांबरीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते व गटर्सची नियमित साफसफाई नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्यासही मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील उद्यानांच्या देखभाल कामांनाही नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
आरोग्य सुविधांवरही भर..
वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयातील पीपीपी तत्त्वावरील एमआरआय केंद्रांमार्फत पात्र रुग्णांच्या करण्यात आलेल्या मोफत व सवलतीच्या एमआरआय तपासण्यांच्या बिलांची अदायगी करण्यास मंजुरी देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी नॉन-क्लोरीनेटेड लाल व पिवळ्या पिशव्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासही मान्यता देण्यात आली.
क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांनाही पाठबळ..
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे होणाऱ्या १६ व्या ज्युनिअर महिला नॅशनल हॉकी स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व विचार प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या विद्युतविषयक खर्चास तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.
नागरिकहित केंद्रस्थानी ठेवून निर्णय..
शुद्ध पाणीपुरवठा, सक्षम रस्ते, सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार आरोग्य सेवा आणि स्वच्छता यांना प्राधान्य देतानाच आपल्या युवकांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकहित, गुणवत्ता आणि कार्यक्षम प्रशासन यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती नेहमीच कटिबद्ध राहील.
– अभिषेक बारणे,
सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.


















